Monday, May 29, 2006

पहिला पाऊस

रखरखली मनं
चिकचिकली तनं
भेगाळली माती
सुकलेली पाती
निष्पर्ण तरूंवर चोची आसुसतात,
वैशाख वणव्यात डोळे सावली शोधत भिरभिरतात
नदी नाले आटतात, ओठ सुकतात,
पाहुण्याच्या वाटेकडे सारे डोळे लावून बसतात

कुठुनसा हळूच थंडावा येतो,
बघता बघता वारा पिसाट होतो
वादळी पानं भिरभिरतात,
धुळीचे लोट उठतात
आभाळ भरून येतं
सारंच कसं जडावतं
मेघांचा गडगडाट वरुणाचा कौल बोलतो
पसरलेल्या तळव्यावर हलकेच एक मोती येऊन विसावतो
विजेचा लखलखाट चारी दिशा उजळतो
स्तब्ध निसर्ग मल्हार आळवतो

पहिला पाऊस बरसतो ! पहिला पाऊस बरसतो !!

तापल्या धरतीवर
सरी सडा शिंपतात
धुंद मृद्गंध नसानसात भरतात
वार्धक्याला तारुण्याचे कोंब फुटतात
भूमातेला सृजनाचे वेध लागतात
ढेकळं विरघळतात
ओहळ खळाळतात
डोळे निवतात
मनं विसावतात
विजेच्या तारांवर मणी ओघळतात
इवल्या तळ्यांत कागदी होड्या तैरतात

आटलेली शाई, बुजलेली लेखणी
अमृताच्या शिडकाव्यानं झरझर झरते
शब्दब्रह्माला रचनेचं स्वप्न पडतं
पहिल्या पावसात माझं मन हरवतं...

8 Comments:

Blogger Nandan उवाच ...

निखिल, कविता छान आहे. आम्ही देखील चातकासारखी प्रतीक्षा करत होतो, नवीन लेखाची. पावसाबरोबर तीही पूर्ण झाली. :)

11:24 AM  
Blogger P उवाच ...

:) छान. आता बरच वाचायला मिळुदे तुमच्याकडुन.

12:21 PM  
Blogger Akira उवाच ...

Surekh kavita Nikhil....wachun punha pahilya pawasacha ananda lutata aala :)

9:05 PM  
Blogger शैलेश श. खांडेकर उवाच ...

छानच आहे कविता. आता पुढील रचना लवकरच येऊ द्या की, :).

9:57 PM  
Blogger paamar उवाच ...

test.

11:55 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

ओह...माझ्या देशातला पाऊस...दुथडी भरून वहाणाया नद्या..भातशेती..धुक्यातले डोंगरमाथे...आणि कांदाभजी !!:)

अमित

6:39 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

pahila paus suru houn barech diwas zale ata.. pan hi kavita wachun ek charoli athawali...

Thanda hava, dhagal aakah,
dhukyat dongar ani maticha shwas
garamagaram bhaji, kadak chaha,
chimba bhijayla tayar raha

9:58 AM  
Blogger Manaswini उवाच ...

Pavasavar itki chhan kavita purvi kadhi vachli navhati..

Utkrusht jamliye..

Aabhaari,
Dhanwanti

7:16 AM  

Post a Comment

<< Home