Sunday, May 10, 2009

पिंजरा आणि घर

नाही नाही, ’पिंजरा आणि घर’ हे टायटल थोडेसे दिशाभूल करणारे आहे ! पण विषय असा आहे -

मी लहान असताना आई बाबा मला आणि अर्चनाला ब-याच वेळेला पेशवे पार्क मधे घेऊन जायचे. तिथे ब-याच प्रकारचे प्राणीपक्षी दाटीवाटीने कोंबलेले असायचे ! हत्ती, पांढरा वाघ, चंडोल (हे त्या पक्ष्याचे खरे नाव होते की आम्हाला ते तसे वाटायचे कोण जाणॆ!) आणि गोल्डन पीझंट ही लक्षात राहिलेली काही खास नावे ! वरच्या बाजूला सारसबागेला लागून फुलराणी आणि घसरगुंड्या-झोपाळे ! मे महिन्याच्या सुटीत आई असेल तर रविवार सकाळ आणि बाबा पण असतील तर गुरुवार सकाळ या बेतात छान जायची !

तिथे वाघ-सिंह इत्यादि हिंस्र श्वापदांच्या पिंज-यामधे एक खास व्यवस्था असायची - ’आतला पिंजरा’. दुपारी प्राण्यांची जेवायची वेळ झाली की पिंज-यात खाणे ठेवायला, अथवा पिंजरा झाडून साफ करताना या प्राण्यांना ’आतल्या’ पिंज-यात हाकलायचे ! दोन्ही पिंज-यांमधे बाहेरून उघडता येणारे एक सरकते दार असायचे. बाबांनी मला खेळायला एक असाच पिंजरा बनवून दिला होता. ’ब्रुक बॉन्ड’ चहाच्या खोक्यापासून बनवलेला. पिंज-याच्या पूर्ण जाळीच्या भिंती, आतला पिंजरा, त्याचे सरकते दार, मुख्य दरवाजा, त्याला कडी !! अतिशय बारकाईने निरीक्षण करून हुबेहूब बनवलेले मॉडेल होते ते. पिंज-यात हवा खेळती रहावी म्हणून छपराला काही गोल आकाराची मोठी भोके सुद्धा होती. आम्ही त्याचा उपयोग फारच विनोदी प्रकारे करायचो ! ’चंडोल’ हा अर्चनाचा लाडका पक्षी आणि ’हत्ती’ मला जीव की प्राण ! आमच्या कडे खेळण्यातले अनेक चिमुकले प्राणी पक्षी होते, त्यात अर्थातच हे दोघेही होते. तेव्हा आमचे भांडण झाले की आम्ही एकमेकांवर सूड उगवायला बिचा-या ’चंडोल’ आणि ’हत्ती’ ला वाघाच्या पिंज-यात छपरातल्या भोकातून आत टाकायचो ! हा बालिशपणा आठवला की आता जाम हसू लोटते !

तसंच कुठल्याशा खोक्यापासून बाबांनी एक घर पण बनवले होते ! तो उद्योग तर कित्येक महिने चालू होता ! मी मधून मधून कामाचा progress review आणि follow up करत असे :) मॅनेजरचे पाय पाळण्यात दिसतात म्हणायला काही हरकत नाही :) ते घर तर फारच झकास होते. दुमजली, व्यवस्थित उघडणारी-मिटणारी सुबक खिडक्या-दारे, उतरते कौलारू छप्पर, घराच्या आतून आणि बाहेरून जिना, आतल्या जिन्यात प्रकाश यावा म्हणून भिंतीत बसवलेली जाळी, खिडकीची तावदाने, बाजरी काचेचा आभास निर्माण करायला लावलेला ब्लेडच्या आवरणाचा बटर पेपर ! विलक्षण कौशल्याने आणि विचारपूर्वक बनवलेले घर होते ते.

दर गुरुवारी असले काहीतरी करून घ्यायला बाबांच्या मागे माझी भुणभुण असे. आठवड्यातला एकच सुटीचा वार असूनही बाबा पण मोठ्या आवडीने हे उपद्व्याप करायचे.

आजच्या पिढीतले पालक मुलांना घेऊन मल्टिप्लेक्स मध्ये जातात, होटेलिंग आणि कपड्यालत्त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, महागडे विडिओ गेम्स घेऊन देताना पैशाचा विचार करत नाहीत. पण ते सुटीच्या दिवशी मुलांबरोबर तासनतास खर्च करून, ब्लेड-कर्कटक-कात्री आणि पुठ्ठे घेऊन मुलांना पिंजरा आणि घर बनवून देतात का ते माहीत नाही.

मला लहानपणी अंगात घातलेले कपडे विशेष आठवत नाहीत. कोणत्या होटेल मध्ये जायचो तेही आठवत नाही.
’पिंजरा आणि घर’ मात्र स्मृतीत कायमचे कोरले गेले आहेत.

---

’सेवा सहयोग’ या सेवाभावी संस्थेच्या 'School Kit Donation drive' या उपक्रमामध्ये मी सहभाग घेतला आहे. माझ्या कंपनीतल्या सहका-यांकडून वर्गणी गोळा करायला मला एक Drop-Box हवी होती. मी बाबांना ’बनवून देता का’ म्हणून विचारले. त्या निमित्ताने ’पिंजरा आणि घराची’ आठवण झाली !! आपल्याला 'School Kit Donation drive' ची माहिती येथे मिळेल. थोडक्यात सांगायचे तर - शाळेत जाणा-या आपल्या असंख्य चिमुकल्या दोस्तांना नवीन दप्तर-कंपास-वह्या विकत घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. या लहानग्यांना हा आनंद मिळावा यासाठी हा प्रयत्न ! देशातल्या वा परदेशातल्या वाचकमित्रांना या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावायचा असेल तर वेब-साईट वरील माहिती पहा अथवा माझ्याशी nikhilmarathe at gmail dot com येथे संपर्क साधा !

Sunday, February 08, 2009

सूर

रविवारची सायंकाळ असावी
वीक एन्ड संपल्याचं रितेपण मनात असावं
पावलं कुठंतरी एकांत शोधायला वळावीत
तळजाई टेकडीच्या माथ्यावर
एखाद्या पायवाटेच्या कडेला

विसावायला जागा असावी
लोकांचा गोंगाट नसावा
ओळखीचं कुणी न भेटावं
भेटलं तरी न पहावं
पाहिलं तरी न बोलावं
मनाच्या डोहात एका शब्दाचा खडा पण न पडावा
थंड वा-याची झुळूक अंगावर मोरपीस फिरवून जावी
पायाखाली सोनेरी पानगळ असावी
निष्पर्ण तरूंच्या काटेरी खराट्यांमधून
परतीला निघालेला लालबुंद गगनराज दिसावा
घड्याळाचा काटा न रुतावा
कानवर हेडफोन असावा
कानातून हृदयात उतरणारे सूर असावेत
माझं मीपण हरवावं

अहंकाराचं ओझं फेकल्यावर
जीव कसा पिसासारखा हलका होतो !
तो सुरांवर हलकेच सोडून द्यावा
तरंगू द्यावा मजेत, मस्तीत
पाण्यावर सोडलेल्या दिव्यासारखा
स्वत:च्याच प्रतिबिंबाशी संवाद साधत

सूर ऐकावेत
दुरून न ऐकता त्यांची गळाभेट घेत
सूर होऊन
सूर अनुभवत
सुरांसह मनानं डोलावं
आंदोळावं

सुरांवर आरूढ झालं की प्रत्येक सफर वेगळी!
कधी नि:शब्द जलाशयात
वल्ह्यांचा चुबुक चुबुक असा लडिवाळ आवाज करत हलकेच जाणा-या होडीसारखी
कधी घसरगुंडीसारखी वेगवान
कधी फ्री फॉल सारखी श्वास रोखायला लावणारी
तर कधी रोलर कोस्टर सारखी
तानेच्या प्रत्येक खटक्यावर श्वासात मस्ती भरणारी

अंधार झाला की जाणवावं
सुरांबरोबरची जिवाभावाची भेट आटोपती घेऊन
तृप्त पावलं परतावीत
पुढच्या भेटीचा वायदा करत.

Monday, February 02, 2009

आंब्याचा मावा

रचनानं आंब्याच्या माव्याचं पॅकेट पिशवीतून काढून फ्रीजच्या कडेच्या कप्प्यात ठेवलं. या रविवारी चक्क घरी आंबा बर्फी करण्याचा बेत घाटत होता. रेसिपी आणि बाकी सामान सज्ज होतं. उगाच चितळ्यांना कशाला अवाच्या सवा पैसे टिचवायचे ! एकदा रेसिपी कन्फर्म करायला आणि मनोधैर्य वाढवायला आईला फोन केला की झाले ! तेवढ्यात सेलचं रिमाईंडर वाजलं म्हणून पाहिलं तर आज US manager बरोबर 1:1 कॉल होता ! हो, आज सोमवार नाही का ! अरे बापरे. आजकाल गोष्टी लक्षातच राहत नाहीत काही काही वेळा! काय डिस्कस करायचंय त्याच्या अजून नोट्स काढायच्या होत्या. धावत पळत रचनानं बॅगमधून लॅपटॉप काढला आणि स्पीकर फोनजवळ आसन जमवलं. तेवढ्यात हेमा आणि हिमांशू यांच्यात काहीतरी खुसफुस आणि नेत्रपल्लवी झालेली तिच्या नजरेतून निसटली :)

---

हिमांशूनं शाळेतून आल्या आल्या दप्तर कोप-यात भिरकावलं आणि फ्रीजचं दार उघडलं. दिवसभर शाळेत त्याच्या डोळ्यासमोर फ्रीज येत होता ! आंब्याचा लाल चुटुक मावा प्लॅस्टिकच्या पिशवीत आरामात विसावला होता. ते पाहून त्याच्या डोळ्यात चमक उत्पन्न झाली ! त्याची चाहूल लागून हेमा स्वयंपाकघरात अवतीर्ण झाली.

"हिम्या घुबडा तुला काही अक्कल दिली आहे की नाही देवाने ?" हेमाने आक्रमक सुरुवात केली.

"तुला काय करायचंय ? माहीत आहे तुला फार जास्ती दिलीये ते". हिमांशूने उर्मट प्रत्युत्तर केले.

"मूर्खा, काल आईच्या समोर काय बावळटपणा चालला होता ? अधाशी कुठला. तुझ्यामुळे आपण दोघेही गोत्यात येणार आहोत एकदा. थोडा पेशन्स नाही का ठेवता येत तुला ?"

हेमाचं फायरिंग बिनतोड होतं. आंब्याचा मावा आणि आपलं धाकटेपण लक्षात घेता हिमांशूने पड खाल्ली. अशा पद्धतीने शांतता प्रस्थापित झाल्यावर हेमाने ऑपरेशन ’मास्टरमाईंड’ करायला सुरुवात केली.

"हे बघ - प्लॅस्टिकच्या पिशवीला दोन स्टेपल्स आहेत. त्या जरा कडेलाच मारल्या आहेत. आपण त्यांच्या मधून हळूच बोट आत खुपसून एक लचका तोडू. आणि लक्षात ठेव - आईला चुकून माकून संशय आलाच तर आम्ही दोघांनी मिळून पिशवी उघडली असं सांगायचं. मागच्या वेळसारखी हरामखोरी केलीस तर तुझी काही धडगत नाही." हेमानं सज्जड दम भरला. हो, बरोबरच आहे. Even Pirates have a code of conduct !
दोन स्टेपल्सच्या मधून पिशवीचे फोल्ड हळूवार उलगडत हेमाच्या बोटांनी एकाग्रतेने आंब्याचा माव्यापर्यंत मजल मारली. । एकाग्रता यशोबीजम । दोन बोटांत एक लपका पकडून ठेऊन हळूहळू बाहेर काढण्यात ती कमालीची यशस्वी झाली. एवढ्या परिश्रमांनी बाहेर काढलेला आंब्याच्या माव्याचा गोळा जिभेवर अर्ध्या मिनिटात कसा विरघळला ते समजलेही नाही ! आता फक्त पिशवीतल्या माव्यात एक छोटासा खड्डा पडल्यासारखा दिसत होता. हिमांशूनं बाहेरून पिशवी दाबून आतला मावा जरा चपटा आणि सरसा केला आणि पुन्हा पहिल्यासारखा आकार आणला !

---

रचनाला आज कामाचा काही मूडच येत नव्हता. नवीन फीचर कसा डिझाईन करायचा याचा विचार करून करून तिच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या. उगाच थोडे कोड लिहून पाहिले, पण गाडी अडकायला लागली. होतं एखाद्या दिवशी असं. तसंही वीक एन्ड पर्यंत वेळ आहे अजून. होईल, होईल. आज स्टेटस मीटिंगला तिनं ’बेसिक हाय लेव्हल डिझाईन चालू आहे’ असं काहीतरी थातुर मातुर स्टेटस दिलं होतं. उद्या काय नवीन सांगायचं तो प्रश्नच होता. तेवढ्यात आदिती क्यूबमधे डोकावली.
"काय ग काय चाललंय ?"
"काही नाही ग, ते डिझाईन कंप्लीट करायचं होतं ना नव्या मोड्युलचं, ते जरा पाहत होते"
"पॅन्ट्रीत चहा घ्यायला येतेस ?"
"अग आत्ताच कामाला हात घातला होता..." रचनानं गुळमुळीत कारण पुढे केलं.
"करशील ग. जरा updates होते" एक डोळा बारीक करून आदितीनं हलक्या आवाजात सांगितलं.
मग रचनानं उगाच आढेवेढे घेतले नाहीत.
...
...
"मग डुरक्या काय म्हणला ?" रचनाला उत्सुकता आवरता येत नव्हती.
"स्स्स्स्स अग हळू बोल ना ! नाहीतर पुढल्या ’ले ऑफ’ ला आपला नंबर लागेल"
"अग डुरक्या म्हणजे कोण ते कोणाला कळतंय ?"
"कळतं सगळं. एक वेळ काम कसं करायचं ते नसेल कळत, पण बाकी सगळं समजतं"
...
...

रचना समाधानानं क्यूबमधे परतली. ही आदिती पण भन्नाट आहे. कुठून कुठून बातम्या मिळवते कोण जाणे ! पण अपडेट महत्वाचा होताच. मग तिनं जाऊन समोरच्या विंग मधल्या उमाला थोडी कल्पना दिली. आज आता कामात लक्ष लागणं अवघडचं होतं...

---

आंब्याच्या माव्याचा एक तुकडा खाऊन काय होतंय समाधान ! हेमाने अस्वस्थपणे एक दोनदा उगाचच इकडून तिकडे चकरा मारल्या. मग पुस्तक वाचण्याचं सोंग करणा-या हिमांशूकडे तिनं नजर टाकली.
"ए हिमू"
"काय ग?"
"काही नाही, असंच म्हणलं काय करतोयंस ?"
"काही नाही"
उरलेली वाक्ये ’नजरेने’ पूर्ण झाली. wavelength जुळणं म्हणतात ते हेच.
माव्याचा एक तुकडा बाहेर काढून झाला. पण मग दोघांनाही जाणवलं - उगाच काटकसर करण्यापेक्षा दोघांनी एकेक तुकडा खाल्ला तर असा काय मोठासा फरक पडतोय !
मावा थोडा खाली गेल्यासारखा दिसत होता. हेमाने मग तो अधिकाधिक चपटा करून वर ढकलला. क्षेत्रफळ तेवढेच राहिले पाहिजे. जाडी कमी झालेली फारशी समजणार नाही आईला. भूमितीचे ज्ञान कामाला आले !

---

रचनाने चहा करायला फ्रीजमधून दूध बाहेर काढले. संध्याकाळी बाल्कनीमधे बसून चहा पिणे हा तिचा आवडता कार्यक्रम होता. आज दुधाचे पातेले उचलताना तिची आंब्याच्या माव्याकडे नजर गेली. मग तिला थोडी खुशी आणि थोडंसं अनामिक दडपण जाणवलं.

---

"हाय लेव्हल डिझाईन ऑलमोस्ट झालंय. थोडे इश्यूज आहेत. ते आज सॉल्व्ह होतील मोस्टली." रचनानं नितीनला अतिशय जनरल स्टेटस अपडेट दिला.

"Ok. Things are on track, right?"
"Yes, yes, very much on track"

"टास्क किती % कंप्लीट आहे असं लिहू?"

" Umm 15 % "

नितीनला जरा अन्कम्फर्टेबल वाटलं पण त्यानं दुर्लक्ष केलं.

---

"आंब्याच्या माव्याची पातळी जरा जास्तच खाली गेल्यासारखी वाटतिये का रे ?"
"थोडी वाटतिये, पण जाऊ दे. आता काय करणार ?"

---

आज इन्वेस्टमेंट प्रूफ्स द्यायची होती ऑफिसमधे. टॅक्स कॅल्क्युलेशन साठी. कटकटच असते ही एक. रांगेत चांगले दोन तास मोडले. काम कसलं डोंबलाचे होणारे मग ? आज तर सांगून वेळ मारून नेली की "कोड झालंय, पण काही इंटिग्रेशन इश्युज येत आहेत. बेसिक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे वगैरे वगैरे." पाहू कसे काय होतय.

---

आंब्याच्या माव्याची पातळी उन्हाळ्यातल्या भूजल पातळी प्रमाणे खालावली होती. हेमा आणि हिमांशूने एकमेकांकडे साभिप्राय पाहिले. आता पिशवीचा आकार कसाही बदलून, चपटून, थापटून उपयोग नव्हता. मावा निम्म्यावर संपला होता. आता बोलणी तर खायचीच होती. शेवटी दोघांनी मनाचा हिय्या केला. हेमाने सरळ स्टेपल्स काढून टाकल्या आणि उरला सुरला सगळा गोळा दोघांनी खाऊन टाकला. रिकामी पिशवी मात्र पुन्हा फ्रीजमधे ठेवायला ते विसरले नाहीत !

---

गेले ३-४ दिवस खूप सारवासारवी करून झाली. आज शुक्रवार होता, सोमवारी डेडलाईन होती आणि काम झालेले नव्हते. स्टेटस कसेही दिले तरी उपयोग नव्हता.
"नितीन, माझं काम थोडं लॅग होत आहे. काही unexpected issues मुळे माझा प्रोग्रेस जरा स्लो झाला."
"रचना, आपल्याला सोमवारची डेडलाईन आहे. Quality Assurance ला hand off ठरला आहे. तुला माहीतच आहे की आपले प्रोजेक्ट रिस्कच्या जवळपास आहे. We can not afford to miss this deadline."
" Umm मंगळवार पर्यंत डिले झालेला नाही चालणार का?"
" Doesn't look possible to me. We have to stick to our schedule. So please plan accordingly"
'Plan accordingly' . म्हणजे वीक एंड ला काम कर. Hmmm आधी पापे केली, ती निस्तरा आता. आता आंबा बर्फी विसरा. करा कोडिंग. छे छे छे. आग लागो त्या जॉब ला.
घरी येई पर्यंत रचनाच्या डोक्याचा भाजलेला पापड झाला होता.

चहा टाकावा म्हणून दूध घ्यायला फ्रीज उघडला तेव्हा रचनाची नजर आंब्याच्या माव्याकडे गेली. काहीतरी गडबड वाटली. अरेच्या ! माव्याची पिशवी कुठे गेली ! पिशवी तर तिथेच होती ! मग मावा कुठे गेला !!

रचनाचे उरले सुरले डोके एकदमच आऊट झाले.
"हेमा sss"
"हिमांशू sss"
"एका मिनिटात इथे हजर व्हा".
कारस्थानातील पकडलेले आरोपी मान खाली घालून हजर झाले. आईच्या आवाजाच्या पट्टीवरून त्यांना त्यांचे भवितव्य लगेच कळले.

"लाजा नाही वाटत तुम्हाला ? पाव किलो आंब्याचा मावा खाल्लात चार दिवसात ? अक्क्ल गहाण टाकलीत का काय ? का कुठे खायला मिळत नाही ? आं ? बर्फीसाठी आणला होता ना ? आता बसा बोंबलत. तुम्हाला ती दुकानातली बर्फीच प्रिय ना. काही करणार नाही आता बर्फी न टर्फी पुन्हा. आणि काय ग हेमा, तो हिमांशू एक लहान आहे. तुला पण समजत नाही ? त्याला असं शिकवतेस ? जा चालते व्हा इथनं. तोंड नका बघत बसू माझं. यूसलेस".

हेमा आणि हिमांशू नं काढता पाय घेतला. पण हे तसे अपेक्षितच होते. आता बाबा आल्यावर अजून काय होईल ते पाहू असा विचार करून त्यांनी सहानुभूती मिळवायला उगाचच पुस्तके उघडली. लक्ष मात्र एकमेकांकडे आणि बाबांच्या बेल कडे होते !

हताश होऊन रचनाने आरामखुर्चीत अंग टाकले आणि चहाचा कप तोंडाला लावला. कपभर चहा पोटात गेला तसे तिला जरा तरतरी आली. रागाचा उद्रेक होऊन गेला तसे तिला जरा बरे वाटले. "लेकरांवर एवढे भडकलो आपण, वीक-एन्ड ला काय डोंबल बर्फी करणार होतो !" तिच्या मनात प्रामाणिक विचार डोकावला. हेमाला हाक मारून ती म्हणाली -

"हेमा, मला आज जरा बरं वाटत नाहीये. जा - दोघे जण प्राचीमधून पंजाबीचं पार्सल आणा. आणि असं पुन्हा करू नका. घरातल्या घरात कसले रे चोरून खाता. आवडतो एवढा मावा तर सांगायचे न ! अजून एक पाकीट आणले नसते का !"

कहानी मे ट्विस्ट !! हेमा आणि हिमांशू या अनपेक्षित सुटकेमुळे भलतेच खूश झाले ! आंब्याच्या माव्याची चोरी तर पचलीच, वर पंजाबीची ट्रीट ! Thats cool !!

Monday, July 03, 2006

आनंदे नटली !

वृक्षांकडे पहा
गगनभरारी घेणा-या विहंगांकडे पहा
नभ आच्छादणा-या मेघांकडे पहा
अनंताच्या पोकळीत डोळे मिचकविणा-या ता-यांकडे पहा...

आणि जर तुम्हाला 'दृष्टी' असेल
तर तुम्हाला दिसेल
की या सा-यांचं आस्तित्वच आनंदमय आहे
प्रत्येकजण केवळ आनंदी आहे !

खरंतर वृक्षांना आनंदी असण्याचं कोणतं कारण आहे ?
ते ना पंतप्रधान बनणारेत, ना राष्ट्रपती
ना ते कधी श्रीमंत होणार आहेत
ना त्यांच्या गाठीशी कधी पुंजी साठणार आहे !

तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत,
पण ही उमललेली फुलं आनंदी आहेत.
खूप खूप आनंदी आहेत...

(स्वैर अनुवाद)

Tuesday, June 27, 2006

फूल फुलताना ...

कारचे दार उघडून सागरने लॅपटॉपची बॅग आत ठेवली. सीटवर पाठ टेकून टायची गाठ सैल केली. उघड्या काचेतून थंड वारा लागला तेव्हा त्याला थोडेसे बरे वाटले. मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे-लाल रंग पालटत होते. पाय यांत्रिकपणे ब्रेक- ऍक्सिलरेटर ऑपरेट करत होते. गेल्या काही महिन्यांतल्या घटना डोळ्यासमोर चलतचित्राप्रमाणे सरकत होत्या...

वेगात आगेकूच करणा-या दुचाकी बाजारात कंपनीने नवी बाईक लॉंच केली होती. संपूर्ण युनिट एकच ध्यास घेऊन काम करत होते. माईलेज, पिक-अप, लुक्स, कंफर्ट - अनेक घटक विचारात घेऊन काम जोमाने चालले होते. या नव्या बाईकला मार्केटचा प्रतिसाद उत्तम मिळाला होता. वाढत्या स्पर्धेत टिकाव धरून कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले होते. हे यश साजरे करायला कंपनीने एक मोठी पार्टी आयोजित केली होती आणि तिथेच बिनसले होते ! डायरेक्टरनी यशाचे गमक म्हणजे 'तरुणाईला खेचणारा' बाईकचा 'सेक्सी लुक' असल्याचे आवर्जून नमूद केले. केवळ संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. सागरच्या युनिटमधे मात्र मोठीच निराशा पसरली होती. बहुतेक बाईकला वेग देणारे इंजिन असते, चाके असतात, हे टॉप मॅनेजमेंट विसरली असावी. 'कर्मण्येवाधिकारस्ते' प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे हे सागरला प्रथमच जाणवले ! विचारांच्या नादात गाडी घरापाशी आली तेव्हा सागर भानावर आला. ऑफिसच्या कटकटी उंबरठ्याबाहेरच सोडण्याचा तो नेहमी प्रयत्न करायचा...

दार उघडून नेहाने हसून त्याचे स्वागत केले.
लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी प्रेम अजून ताजेतवाने होते.
'कसा काय गेला दिवस ?'
'झकास!'
'बा‍ऽबाऽऽ' चिमुकल्या सायलीने गळ्यात इवलेसे हात टाकले.
'काय म्हणते आमची चिमणी' ? सागरने लाडाने सायलीच्या गालगुच्चा घेतला.
"A man travels the world in search of what he needs and returns home to find it" किती खरंय हे वाक्य, सागरला जाणवले !
'अरे दिवसभर तिची भुणभुण चाललीये, तिला बागेत घेऊन जातोस का?'
'जातो की. तेवढे चहाचे इंधन टाक आमच्या टाकीत म्हणजे निघालो!'

सागरचे बोट पकडून सायलीची स्वारी बागेत निघाली. बागेत तिला तिच्याएवढे छोटे दोस्त मिळाले. लहान मुलांना काय, मैत्री करताना 'सोशल स्टेटस, फायनान्शिअल बॅकग्राऊंड, प्रोफेशन' असल्या भिंती आड येत नाहीत - सागरच्या मनात विचार आला. गुलाबांच्या एका ताटव्यापाशी बसून तो मुलांची किलबिल पाहत राहिला...

तासभर बागडून झाल्यावर सायली बाबांकडे आली आणि 'दमले' असे म्हणून त्याच्या मांडीवर आसन जमवले. एवढ्यात तिच्या चंचल डोळ्यांना मागच्या ताटव्यातले सुंदर गुलाब दिसले. 'अय्या कित्ती सुंदर आहेत ही फुलं' ती आनंदाने चित्कारली. पण त्या 'सुंदर' या शब्दाने सागरचा मनातल्या चुकीच्या तारा छेडल्या गेल्या... सायलीला जवळ घेऊन तो म्हणाला,
'बेटा, गुलाबाची फुलं सुंदर आहेतच. ती सगळ्यांनाच आवडतात. पण फुलं पाहतेस तेव्हा त्या फुलांना आधार देणारे डेख पहा. ते काटेरी दिसते न? तरीसुद्धा. ते खोड पहा. तेही सुंदर दिसत नाही न ? पण फूल फुलायला तेही लागतात... झाडाला जीवनरस आणून देणारी मुळं ? ती तर बिचारी जमिनीत राहतात - आपलं तोंड कायमचं लपवून...ती तर दिसतही नाहीत. दिवसभर राबणारे माळ्याचे रापलेले हात सुंदर दिसत नाहीत. पण बाग फुलवायला लागणारं पाणी तेच शिंपतात... त्यांचंही कौतुक कर'

सायलीला समजलं नाही की बाबा आज हे काय बोलतायत ! तिच्या चिमुकल्या मेंदूत झालेला विचारांचा गुंता सागरने तिच्या डोळ्यांत वाचला आणि त्याला आपली चूक समजली ! चटकन हसून तिचे केस विसकटून तो म्हणाला,
'तुला नाही समजलं ? तू लहान आहेस अजून. मोठी झालीस की समजेल !!'.

मग स्वतःशीच हलकेच उद्गारला 'कदाचित समजेल. कदाचित नाहीसुद्धा ! तसंही सगळ्याच मोठ्यांना थोडीच समजतं हे !'

Monday, May 29, 2006

पहिला पाऊस

रखरखली मनं
चिकचिकली तनं
भेगाळली माती
सुकलेली पाती
निष्पर्ण तरूंवर चोची आसुसतात,
वैशाख वणव्यात डोळे सावली शोधत भिरभिरतात
नदी नाले आटतात, ओठ सुकतात,
पाहुण्याच्या वाटेकडे सारे डोळे लावून बसतात

कुठुनसा हळूच थंडावा येतो,
बघता बघता वारा पिसाट होतो
वादळी पानं भिरभिरतात,
धुळीचे लोट उठतात
आभाळ भरून येतं
सारंच कसं जडावतं
मेघांचा गडगडाट वरुणाचा कौल बोलतो
पसरलेल्या तळव्यावर हलकेच एक मोती येऊन विसावतो
विजेचा लखलखाट चारी दिशा उजळतो
स्तब्ध निसर्ग मल्हार आळवतो

पहिला पाऊस बरसतो ! पहिला पाऊस बरसतो !!

तापल्या धरतीवर
सरी सडा शिंपतात
धुंद मृद्गंध नसानसात भरतात
वार्धक्याला तारुण्याचे कोंब फुटतात
भूमातेला सृजनाचे वेध लागतात
ढेकळं विरघळतात
ओहळ खळाळतात
डोळे निवतात
मनं विसावतात
विजेच्या तारांवर मणी ओघळतात
इवल्या तळ्यांत कागदी होड्या तैरतात

आटलेली शाई, बुजलेली लेखणी
अमृताच्या शिडकाव्यानं झरझर झरते
शब्दब्रह्माला रचनेचं स्वप्न पडतं
पहिल्या पावसात माझं मन हरवतं...

Sunday, March 26, 2006

मी कोण ?

विदेशाहून पातले ।
दोन पदीं थाटले ।
तोचि 'लाभ' ओळखावा ।
'त्याग' तेथेचि जाणावा ॥