Sunday, October 23, 2005

गुत्ता

मी दारूच्या गुत्त्यात कधीच गेलो नव्हतो
खरंच.

मी दारूच्या गुत्त्यात कधीच गेलो नव्हतो
गरजच नव्हती
नक्की?
अर्थातच.
म्हणजे हो
म्हणजे ... नाही
म्हणजे ... मला नीटसं सांगता येत नाही ...
पण त्याने असा काय मोठा फरक पडतो ?
हे खरं की
मी दारूच्या गुत्त्यात कधीच गेलो नव्हतो

माझे पुष्कळ मित्र जायचे
मी पाहायचो
दुरूनच
मोठा अजब गुत्ता होता तो
कोणी आलं-गेलं, की उघड्या दारातून
दिसायचं तेवढं पाहायचो

मोठा अजब गुत्ता होता तो
देशी-विदेशी म्हणाल ती मदिरा मिळायची तिथं
सुखी-दु:खी, श्रीमंत-गरीब, सुरूप-कुरूप सारेजण जायचे तिथं
बाहेर पडताना ते अधिक सुखी व्हायचे का दु:खी
ते समजायचं नाही चेहरा पाहून;
आजकाल सारेच मुखवटे वापरतात ...

मित्र मला बोलावायचे
मी नकार द्यायचो
ते चिडवायचे, आग्रह करायचे, हळहळायचे
त्यांच्याकडून वर्णनं तशी खूप ऐकली होती
पण परिणामांना मग घाबरायचं ...
नशा
नशेचीच भिती होती
म्हणूनच असेल, पण
मी दारूच्या गुत्त्यात कधीच गेलो नव्हतो

तो दिवसच काही निराळा असावा
कुणास ठाऊक कुणी खुणावलं !
कुणास ठाऊक पावलं कशी वळली !
पण मी गुत्त्याची पायरी चढलो !!
दरवानानं अदबीनं दार उघडलं
धडधडत्या छातीवर हात ठेवून मी आत गेलो
आत सारंच सुंदर होतं
फक्त दिसायला
प्रत्येकजण आपापल्या चषकातून मद्य रिचवत होता
कुणी समाधिस्त होऊन केवळ निरखत होता
कोणी बुडत्यात होता, कोणी काठावर
मद्याचा नशीला गंध जिथंतिथं भिनला होता
मलाही नशा चढली
मी मद्याला स्पर्शही केला नव्हता अजून, शपथ !
तरीही

साकीनं माझा प्याला अर्धाच भरला !

फेसाळत्या सोनेरी वारुणीनं भरलेला
हो,
अर्धाच भरलेला,
माझा प्याला मी डोळे भरून पाहिला
क्षणभर त्यातला थरार जगलो
अर्ध्या रिकाम्या प्याल्याकडे
पाहिलं सुद्धा नाही !
तरीपण
का कुणास ठाऊक,
माझा प्याला हिंदकळला !
अंगावर शिंतोडे उडाले
ते कोरड्या ओठांनी निरखले
अंगावरचे शिंतोडे वाळले सावकाश
पण नशा पुरती उतरली नाही ...

पावलं अजूनही कधीमधी गुत्त्याकडे वळतात
दरवान हसून स्वागत करतो
पण पावलं उंब-यावरच अडखळतात
तेथूनच परत फिरतो
दूरची वाट चालताना 'शायर' भेटतो
खांद्यावर हलकंच थोपटून म्हणतो,
"हाय कंबख्त! तूने पीही नही ..."

1 Comments:

Anonymous संजय जोशी उवाच ...

नमस्कार
फ़ार पुर्वी हे वाचले होते पण लेखकाचे नाव आज कळले
फ़ारच आवडले
धन्यवाद
संजय जोशी

10:30 PM  

Post a Comment

<< Home