Monday, January 30, 2006

Salary Revision Letter

मंदार आज खुशीत होता. ब-याच दिवसांपासून मिळणार, मिळणार म्हणून चर्चेत असलेली पगारवाढ आज मिळाली होती. मॅनेजरने फिगर्स सांगितल्या आणि सॅलरी रिव्हिजन लेटरसुद्धा दिले. कामाचेही विशेष कौतुक केले ! गेल्या दोन सत्रांतल्या काहीशा फ्लॅट हाईक्स नंतर यावेळेला चांगली वाढ मिळाली होती. दिवसभराचे काम संपवून मंदारने कौतुकाने एकदा 'लेटर' कडे नजर टाकली आणि मग ते बॅगेत टाकून बाईकवर स्वार होऊन निघाला. तशी ही काही पहिली पगारवाढ नव्हती, पण अजून त्यातली मजा टिकून होती !

रात्र झाली होती. दिवसभराच्या कामामुळे शीण आला होता पण मनात उत्साहाचं वारं खेळत होतं. बेल वाजविल्यावर दोन मिनिटांनी दार उघडले. निर्विकार चेह-याने बाबा म्हणाले 'जिन्यातला दिवा बंद कर'. 'दार उघडताना याच्यापेक्षा काही चांगलं बोलता येत नसेल का?' स्वत:शी काहीसा त्रागा करून मंदार आत आला. त्याला आधी आईला न्यूज द्यायची होती... स्वयंपाकघरात आई भाजी निवडत होती. आईला मिठी मारून तो म्हणला 'ओळख' !
आई करवादली - 'मेल्या केलीस का छळायला सुरुवात आल्या आल्या.. किती वेळा सांगितलं मला अंगचटीला आलेलं आवडत नाही म्हणून. हे घर आहे, हिंदी सिनेमा नाही.'
'चूप ग. मला आवडतं'. मंदार म्हणाला, 'आज हाईक मिळाला. हे लेटर.'
'बरं. छान. देवापुढे ठेव ते. सगळ्यांना बरी मिळाली आहे का पगारवाढ?'
'हो हो. माझ्या टीममधे सगळे खूश दिसले.'
'आईट्ले ऐक ना. अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना ?'
'हो. आत्ता होईल अर्ध्या तासात.'
'मग आपण असे करू, स्वयंपाक राहू दे. आपण बाहेर जाऊ जेवायला.'
'कसली अवलक्षणे रे. ऊठसूठ कसले बाहेर जायला हवे तुला ? मागच्याच आठवड्यात पार्टी झाली ना कसली तरी?'
'अग पण तुम्ही कुठे होतात? मी मित्रांबरोबर गेलो होतो. आज सेलिब्रेट करायला जाऊ ना. गार्डन कोर्ट मधे जाऊ.'
'बाहेर खायची चटक लागली आहे तुला. आम्हाला नाही आवडत. मी घरी चांगली शेवयाची खीर करते.'
'आई प्लीsssज'
'कसले डोहाळे रे हे ? कसली अस्वच्छता, कुठली तेलं आणि काय पदार्थ वापरतात हॉटेलांमधे ! इथे घरी सगळे चवीढवीचे पदार्थ बनतात तरी तुमचे मन अडकले आहे हॉटेलात.'
'आई इथे चवीचा प्रश्न नाहीये. अग सगळे मिळून छान गप्पा मारत जेवू. तुलाही स्वयंपाकातून एक दिवस सुट्टी. चांदनी चौकातल्या हॉटेल्स मधून छान व्ह्यू दिसतो पुण्याचा. येताना कॉफी पिऊ मस्तपैकी'
'जशी घरी कधी कॉफी पहायलाच मिळत नाही तुला.'
बाबांनी मधे तोंड उघडले - 'अवाच्या सवा रेट असतात त्या हॉटेलांमधे. तुम्हाला खिशात चार चव्वल आले म्हणून माज आलाय.'
'बरोबर आहे रे. तुम्हाला कल्पना काहीये, पुढे लग्न, मुलं झाल्यावर खर्च काय असतात याची. तुमचे वाढते पगार दिसतात, पण आज मुलांच्या शिक्षणाला किती पैसे खर्च होतात याचे भान आहे का ?'
'आई, एक दिवस हॉटेल मधे गेलं म्हणून यातलं काय काय होणार आहे ? जरा नीट विचार करून तोंड उघडत जा. नसते इश्यूज करू नकोस.' मंदारचा पारा चढला.
'पैशाचा माज बोलतोय' - बाबांची नजर बोलली.
'आत्ता बाहेर यायचा मला तरी उत्साह नाहीये रे बाबा.'
'गाडीतून जायचंय. तुला काय श्रम आहेत?'
'कशाला, तूच जा तुझ्या त्या मित्रांबरोबर. नाहीतरी सगळे तसलेच चटोर. घरी पाय राहत नाही, गावभर उनाडायला हवं. पैसे मिळवले म्हणजे सगळं झालं असं वाटतं तुम्हाला. एक टेलिफोनचं बिल भरायची अक्कल नाही. बाहेर एक वस्तू विकत घ्यायला पाठवली तर बरं वाईट समजत नाही...'
'बास. इनफ. एक जेवायचा विषय तुम्ही पुरेसा ताणलाय. आई, मला घरी जेवायचं नाहीये. माझ्यासाठी अन्न शिजवू नकोस.'

संतापानं धुमसत मंदार बाहेर पडला. कॅपुचिनोच्या कपात राग बुडवायचा त्यानं निष्फळ प्रयत्न केला. खूप वेळ विचार करूनही 'माझं काय चुकलं' हे त्याला गवसलं नाही.

आईचा स्वयंपाक झाला. आई-बाबा जेवायला बसले. 'हल्लीची पिढी कशी बिघडत चालली आहे आणि त्यांचं पुढे कसं कठीण आहे' यावर गपा मारत त्यांचं जेवण झालं.

टेबलावर 'सॅलरी रिव्हिजन लेटर' तसंच पडून राहिलं.

14 Comments:

Blogger शैलेश श. खांडेकर उवाच ...

अप्रतिम! [पामर-स्मृतीकारांकडून यापेक्षा कमी तसही अपेक्षित नाहीये. :)]

गंभीर विषय खुपच सुरेख मांडलेला आहे. मला वाटतं की दोन्ही बाजुंनी आपला मुद्दा जरा बाजुला ठेवायचा प्रयत्न न झाल्याने सॅलरी रिव्हीजन लेटर टेबलावरच राहीले.

5:23 AM  
Blogger Vedashri उवाच ...

बापरे ! असं तर शत्रूबरोबर सुद्धा व्हायला नको. मंदारला पैसे कसे खर्च करायचे याचं ज्ञान नसेल बहुदा, त्यामुळे त्याचे चुकीचे निर्णय त्याला भोवत असावेत, पण तरीही त्याच्या आईबाबांनी त्याला चांगल्या शब्दात गोडीने समजावून सांगायचा प्रयत्न करायला हवा होता ( तसा या अगोदर केलेला नसेल तर ) असं राहून राहून वाटत आहे. अप्रतिम लेखनशैली.

6:45 AM  
Blogger Nandan उवाच ...

हम्म, शैलेशशी सहमत. छान लिहिलाय लेख.

3:58 PM  
Blogger P उवाच ...

नेहमीप्रमणे छान.दोन दोन blog का ते समजल नाही मला. यासाठी विचार्ल कारण मी बरेच दिवसापसुन तोच blog check करीत होते:)

2:16 PM  
Blogger paamar उवाच ...

Hi ! My other blog (paamar) has got some technical problem. So I am not able to publish posts there. So Had to create this new one !

7:08 PM  
Blogger Fleiger उवाच ...

सुंदर आहे. Generation Gap (ह्याला मराठी पर्यायी शब्द काय आहे?), बाकी काय? IT चा हा पण एक फ़ायदा (?) आहे. अर्थात, एवढे म्हणून सोडून देऊन उपयोग नाही. सुसंवाद आणि विश्वास असेल तर हे प्रकार कमी होऊ शकतात.

पण माझ्यामते आता ह्या प्रकारचे वाद-संवाद कमी झाले आहेत.

5:45 PM  
Blogger आदित्य उवाच ...

मंदार आणि त्याचे आई बाबा आपल्या आजूबाजूलाच असतात किंबहुना कमी अधिक प्रमाणात ते आपल्या घरीसुद्धा असतात.'घर' ह्या ठिकाणी किंवा एकंदर कुठेही सुसंवाद किंवा योग्य संवाद नसला की आपला अनेकदा 'मंदार'होतो :) आणि अशी अनेक लेटर्स (किंवा आनंदी प्रसंग) टेबलावरच राह्तात.
आदित्य सायगांवकर

5:57 AM  
Blogger snehal उवाच ...

Hie Nikhil,

Tu pharach sahi lihitos.. Paamar chya "Masa Masoli" nanatar aaj sapdla parat tuza blog.Marathitla blog wachtana chan watata.
Keep writing.

9:15 AM  
Blogger abhijit उवाच ...

afalatun lihilays.
Majhi pagarvadh hiol tyadiwashi mi kalji gheil. Pagarvadh kinva tatsam anandachya kshani nidan aaine tari mulala samajun ghayayla have.

jamlyas majhya blogla visit de..
http://anabhishikt.blogspot.com

5:21 AM  
Blogger Nandan उवाच ...

Hi Nikhil,

Barech diwas kahi lihile nahis. Naveen lekhachi vaat pahatoy.

1:58 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

Chhan post hota..avadla.

Mala anand aahe ki majhe aai vadil ase nahit!!:-)

3:16 AM  
Anonymous Anonymous उवाच ...

Mandarne tycha aanand आई बाबा n barobar sajara karnyacha nirnay agdi barobar hota... jar tyne toch aanad mitranbarobar celebrate kela asta tar? ha vichar tychya aai babani karayla hawa hota...

9:02 PM  
Blogger श्रद्धा उवाच ...

मंदारमधे 'कुठेतरी' मी दिसते आणि त्याच्या आई-बाबांमधे 'कुठेतरी' माझे आई-बाबा.
तसाही सुवर्णमध्य गाठणं, प्रत्येकाला कुठे जमतं? कसं?
पण मांडणी सुरेख आहे कथेची. हळू-हळू विषयापर्यंत पोहचण्याची स्टाइल छान आहे.

8:27 PM  
Blogger Unknown उवाच ...

Hi, I am bit surprised to see why Mandar is not able to handle the situation more amicably, as this was not his first Salary Hike.

We also need to get to the root cause of Mandar's Parents behaviour. i.e. are they uncomfortable in Hotel ambience, afraid of to face people, etc. there must be a reason.... after all ....Mandar is their Son..they have only brought him up, gave him education, etc...
As per me, in case of our Parents..I mean Indian Parents, we MUST be obliged & find a way keep them happy.

Also, Thanks to God! for giving me Lovely Parents !

7:04 PM  

Post a Comment

<< Home