Monday, August 03, 2009

प्रामाणिक (ला)कोड तोड्या

कलियुगातील गोष्ट आहे.

एका गावात दोन (ला)कोड तोडे म्हणजेच साहेबी भाषेत Software Engineers राहत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघेही कोडिंग करायचे. त्यांतील एक कोड तोड्या प्रामाणिक होता तर दुसरा लबाड होता. सकाळी उठायचे, न्याहरी करून ऑफिस मधे जायचे, Source Tree वर चढून कोड तोडायचे (cut copy paste), दुपारच्याला सब वे मधून बांधून आणलेले फुट लॉंग खायचे, अंमळ विश्रांती घ्यायची, आणि मग उशिरापर्यंत राब राब राबून अंधार पडला की घरी परतायचे असा त्यांचा दिनक्रम असे.

एके दिवशी काय झाले, प्रामाणिक कोड तोड्याचे कामात मन लागत नव्हते. म्हणून आपल्या खुराड्या(cube) मधे बसून कोड तोडण्या ऐवजी तो ऑफिसच्या आवारातल्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. बघता बघता त्याला जराशी डुलकी लागली आणि त्याचा लॅपटॉप तलावात पडला. प्रामाणिक कोड तोड्याला खडबडून जाग आली आणि लॅपटॉप पाण्यात पडलेला पाहून तो रडू लागला. त्याला रडताना पाहून एक जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आहेत. त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली, "रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 4 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात पुन्हा बुडी मारली आणि ती अजून एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 2 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हा लॅपटॉप माझा नव्हे. माझा लॅपटॉप तर 1 GB RAM चा होता."

जलदेवतेने पाण्यात तिस-यांदा बुडी मारली आणि ती एक लॅपटॉप घेऊन बाहेर आली. कोड तोड्याने कन्फिगरेशन पाहिले. हा लॅपटॉप 1 GB RAM चा होता. प्रामाणिक कोड तोड्या म्हणाला,

"हाच माझा लॅपटॉप !!"

जलदेवता कोड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूश झाली आणि तिने ते तीनही लॅपटॉप प्रामाणिक कोड तोड्याला बक्षीस देऊन टाकले.

दुस-या दिवशी प्रामाणिक कोड तोड्याच्या मित्राने त्याच्याकडे नवीन लॅपटॉप पाहिला. त्याने विचारले, "मित्रा, या इकॉनॉमी मधे तुझ्याकडे नवीन लॅपटॉप कुठून आला ?" प्रामाणिक कोड तोड्याने त्याला जलदेवतेबद्दल सांगितले. ते ऐकून लबाड कोड तोड्याच्या मनात लोभ निर्माण झाला.

दुस-या दिवशी लबाड कोड तोड्या पोहण्याच्या तलावापाशी जाऊन बसला. तलावाकाठी बसून लॅपटॉप घेऊन कोड तोडू लागला. थोड्या वेळाने त्याने आपला लॅपटॉप मुद्दाम तलावात टाकला आणि मोठ्याने रडू लागला. त्याला रडताना पाहून जलदेवता पाण्यातून बाहेर आली आणि तिने कोड तोड्याला विचारले,

"कोड तोड्या, तू का बरे रडत आहेस ?"

कोड तोड्याने रडत रडत तिला सांगितले,

"माझा लॅपटॉप कोड तोडता तोडता पाण्यात पडला. माझ्याकडे दुसरा लॅपटॉप नाही. माझी उद्या डेडलाईन आहे. ती पूर्ण झाली नाही तर माझे कसे होणार ? घरी म्हातारे आई वडील आणि बायका पोरे - नाही नाही - बायको आणि पोरे आहेत. त्यांचे कसे होणार ?"

जलदेवता म्हणाली,

"रडू नकोस. मी तुझा लॅपटॉप पाण्यातून बाहेर काढून देते."

इतके म्हणून जलदेवतेने पाण्यात बुडी मारली. या खेपेस थोडे Optimization करून ती तीन लॅपटॉप घेऊन बाहेर आली आणि कोड तोड्याला विचारले,

"यातला कोणता लॅपटॉप तुझा होता ?"

लबाड कोड तोड्याने कन्फिगरेशन्स पाहिली. तो म्हणाला,

"माझा लॅपटॉप 4 GB RAM चा होता."

जलदेवतेला लबाड कोड तोड्याचा खोटेपणा आवडला नाही आणि ती लबाड कोड तोड्याला कोणताच लॅपटॉप न देता अदृश्य झाली.

कलियुगाचा महिमा :

प्रामाणिक कोड तोड्या तीन लॅपटॉप घेऊन आयुष्यभर कोडिंगच करत राहिला.

लबाड कोड तोड्याचा लॅपटॉप पाण्यात पडल्याने त्याला कोड लिहिता येईना. मग कंपनीने त्याला मॅनेजर बनवून नवीन ब्लॅकबेरी घेऊन दिला :)


---


कालच्या रविवारी माझी बहीण - अर्चना - मला सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेला असलेले ’पॉइंट बोनिटो’ दीपगृह पहावयास घेऊन गेली होती. दीप गृहाच्या उंचीवरून दिसणारे दृश्य, खाली उसळणा-या फेसाळ समुद्राच्या लाटा, परिसरातील शांतता, भणाणणारा वारा आणि गप्पांमधून जागणा-या, पुण्यात एकत्र व्यतीत केलेल्या बालपणाच्या रम्य स्मृती.
विषय भरकटत आम्ही मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या लाकूडतोड्याच्या गोष्टीवर जाऊन पोहोचलो आणि मग त्या कथेचे विडंबन करायची चांगलीच हुक्की आली !! ही कथा मी आणि अर्चनाने मिळून लिहिली आहे !

12 Comments:

Blogger साधक उवाच ...

Chhhan!

6:58 PM  
Anonymous Anonymous उवाच ...

excellent....!

1:04 AM  
Blogger Random Blogger 3 (Amit Shirodkar) उवाच ...

Very nice!! Baryach divasan nantar ek (as usual) mast post lihilas!!
Keep up the good work!! :-)

3:29 AM  
Blogger Nilu उवाच ...

Good imagination! I sort of expected the ending, but it was fun reading it anyway. Kudos to both you and your sis!

Keep writing.

8:15 AM  
Blogger Somesh Bartakke उवाच ...

गोष्ट भन्नाट आहे .. शिवाय तुमच्या आमच्या आमच्य रोजच्या जगण्यातली असaल्यामुळे विशेष भावते ..

6:46 PM  
Blogger Sandip उवाच ...

Ni. Ma. me hi gosht kuthlya tari fwd madhun wachli... tevha mala hi kalale ki ha tuch asnaar :)
tu ikde kevha aalas bay area madhe code todayla..? aani tuza blackberry cha wapar kasa suru aahe? aata tyala panyaat padu dewu nakos :)

9:53 AM  
Blogger Aparna उवाच ...

Nice one. good imagination :)

9:48 PM  
Blogger Aditi उवाच ...

Good one, Nikhil! (as usual). I didn't guess the ending, so was even more enjoyable.

11:53 AM  
Blogger Ketan उवाच ...

नमस्कार. मी पण तुझी कोड तोड्या ची गोष्ट फ़ॊर्वर्ड म्हणुनच वाचली. सुरेखच आहे.
नन्तर तुझ्य ब्लॊग ची लिन्क मिळाली. खर सान्गतो, तुझा आख्खा ब्लॊग सलग २ दिवसात वाचून काढला..
सुरेखच लिहितोस.. ही गोष्ट आणि बाकी सगळेच पोस्ट्स ब्येस आहेत :)
असाच लिहीत राहा... मी तुझा पन्खा झालो आहे :)

12:31 PM  
Blogger Shubhangee उवाच ...

तुमची गोष्ट मी इ-मेल मधुनच वाचली. फ़ॉरवर्ड करणाऱ्य़ाने लेखकाचे नाव द्यायलाच हवे होते.तुमचा ब्लॉग वाचल्यावर गोष्ट तुमची असल्याचे समजले. खूपच छान आणि खरी देखील.
सौ.शुभांगी राव

12:28 AM  
Blogger Unknown उवाच ...

Just Awesome...Hats off to ur creativity..

Neha

7:13 AM  
Anonymous Atul उवाच ...

mala hi gosht far avadali

9:11 AM  

Post a Comment

<< Home