Monday, January 30, 2006

Salary Revision Letter

मंदार आज खुशीत होता. ब-याच दिवसांपासून मिळणार, मिळणार म्हणून चर्चेत असलेली पगारवाढ आज मिळाली होती. मॅनेजरने फिगर्स सांगितल्या आणि सॅलरी रिव्हिजन लेटरसुद्धा दिले. कामाचेही विशेष कौतुक केले ! गेल्या दोन सत्रांतल्या काहीशा फ्लॅट हाईक्स नंतर यावेळेला चांगली वाढ मिळाली होती. दिवसभराचे काम संपवून मंदारने कौतुकाने एकदा 'लेटर' कडे नजर टाकली आणि मग ते बॅगेत टाकून बाईकवर स्वार होऊन निघाला. तशी ही काही पहिली पगारवाढ नव्हती, पण अजून त्यातली मजा टिकून होती !

रात्र झाली होती. दिवसभराच्या कामामुळे शीण आला होता पण मनात उत्साहाचं वारं खेळत होतं. बेल वाजविल्यावर दोन मिनिटांनी दार उघडले. निर्विकार चेह-याने बाबा म्हणाले 'जिन्यातला दिवा बंद कर'. 'दार उघडताना याच्यापेक्षा काही चांगलं बोलता येत नसेल का?' स्वत:शी काहीसा त्रागा करून मंदार आत आला. त्याला आधी आईला न्यूज द्यायची होती... स्वयंपाकघरात आई भाजी निवडत होती. आईला मिठी मारून तो म्हणला 'ओळख' !
आई करवादली - 'मेल्या केलीस का छळायला सुरुवात आल्या आल्या.. किती वेळा सांगितलं मला अंगचटीला आलेलं आवडत नाही म्हणून. हे घर आहे, हिंदी सिनेमा नाही.'
'चूप ग. मला आवडतं'. मंदार म्हणाला, 'आज हाईक मिळाला. हे लेटर.'
'बरं. छान. देवापुढे ठेव ते. सगळ्यांना बरी मिळाली आहे का पगारवाढ?'
'हो हो. माझ्या टीममधे सगळे खूश दिसले.'
'आईट्ले ऐक ना. अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना ?'
'हो. आत्ता होईल अर्ध्या तासात.'
'मग आपण असे करू, स्वयंपाक राहू दे. आपण बाहेर जाऊ जेवायला.'
'कसली अवलक्षणे रे. ऊठसूठ कसले बाहेर जायला हवे तुला ? मागच्याच आठवड्यात पार्टी झाली ना कसली तरी?'
'अग पण तुम्ही कुठे होतात? मी मित्रांबरोबर गेलो होतो. आज सेलिब्रेट करायला जाऊ ना. गार्डन कोर्ट मधे जाऊ.'
'बाहेर खायची चटक लागली आहे तुला. आम्हाला नाही आवडत. मी घरी चांगली शेवयाची खीर करते.'
'आई प्लीsssज'
'कसले डोहाळे रे हे ? कसली अस्वच्छता, कुठली तेलं आणि काय पदार्थ वापरतात हॉटेलांमधे ! इथे घरी सगळे चवीढवीचे पदार्थ बनतात तरी तुमचे मन अडकले आहे हॉटेलात.'
'आई इथे चवीचा प्रश्न नाहीये. अग सगळे मिळून छान गप्पा मारत जेवू. तुलाही स्वयंपाकातून एक दिवस सुट्टी. चांदनी चौकातल्या हॉटेल्स मधून छान व्ह्यू दिसतो पुण्याचा. येताना कॉफी पिऊ मस्तपैकी'
'जशी घरी कधी कॉफी पहायलाच मिळत नाही तुला.'
बाबांनी मधे तोंड उघडले - 'अवाच्या सवा रेट असतात त्या हॉटेलांमधे. तुम्हाला खिशात चार चव्वल आले म्हणून माज आलाय.'
'बरोबर आहे रे. तुम्हाला कल्पना काहीये, पुढे लग्न, मुलं झाल्यावर खर्च काय असतात याची. तुमचे वाढते पगार दिसतात, पण आज मुलांच्या शिक्षणाला किती पैसे खर्च होतात याचे भान आहे का ?'
'आई, एक दिवस हॉटेल मधे गेलं म्हणून यातलं काय काय होणार आहे ? जरा नीट विचार करून तोंड उघडत जा. नसते इश्यूज करू नकोस.' मंदारचा पारा चढला.
'पैशाचा माज बोलतोय' - बाबांची नजर बोलली.
'आत्ता बाहेर यायचा मला तरी उत्साह नाहीये रे बाबा.'
'गाडीतून जायचंय. तुला काय श्रम आहेत?'
'कशाला, तूच जा तुझ्या त्या मित्रांबरोबर. नाहीतरी सगळे तसलेच चटोर. घरी पाय राहत नाही, गावभर उनाडायला हवं. पैसे मिळवले म्हणजे सगळं झालं असं वाटतं तुम्हाला. एक टेलिफोनचं बिल भरायची अक्कल नाही. बाहेर एक वस्तू विकत घ्यायला पाठवली तर बरं वाईट समजत नाही...'
'बास. इनफ. एक जेवायचा विषय तुम्ही पुरेसा ताणलाय. आई, मला घरी जेवायचं नाहीये. माझ्यासाठी अन्न शिजवू नकोस.'

संतापानं धुमसत मंदार बाहेर पडला. कॅपुचिनोच्या कपात राग बुडवायचा त्यानं निष्फळ प्रयत्न केला. खूप वेळ विचार करूनही 'माझं काय चुकलं' हे त्याला गवसलं नाही.

आईचा स्वयंपाक झाला. आई-बाबा जेवायला बसले. 'हल्लीची पिढी कशी बिघडत चालली आहे आणि त्यांचं पुढे कसं कठीण आहे' यावर गपा मारत त्यांचं जेवण झालं.

टेबलावर 'सॅलरी रिव्हिजन लेटर' तसंच पडून राहिलं.

Sunday, January 22, 2006

ऐकावे जनाचे (अभियांत्रिकी प्रवेश)

बारावीची परीक्षा आटोपून निकाल जाहीर झाला की लगबग सुरू होते 'पुढच्या वाटा' ठरविण्याची. अगदी हल्लीहल्लीपर्यंत शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता 'चांगले मार्क मिळाले, प्रवेश मिळत असेल तर अभियांत्रिकी नाहीतर वैद्यकीय शाखेकडे जायचे' अशी होती. अभियांत्रिकीला पर्याय ठोकळेबाज असायचे. पण गेल्या काही वर्षांत असंख्य ज्ञानशाखांचे आणि शिक्षणसंस्थांचे पेव फुटल्यामुळे ही निर्णयप्रक्रीया कमालीची गोंधळून टाकणारी झाली आहे ! 'कुठल्या महाविद्यालयात कुठली शाखा' ही कॉंबिनेशन्स गोंधळात भरच टाकतात ! मग हा गोंधळ निस्तरायला काही लोक तज्ञांचे (!) मार्गदर्शन घेतात, काही समुपदेशनाचा आधार शोधतात, काहीजण 'कल चाचणी' देतात, तर काही चक्क 'चार लोक काय करतायत' ते करतात !
'चार लोक' काय सांगतात ? या 'चार लोकांत' तज्ञ आले, पालक आले, सिनिअर्स आले, आणि ज्यांचा अभियांत्रिकीशी काहीच संबंध नाही ते पण आले !!

वाचा !!

--

"छे छे ! तुमच्या त्या सगळ्या कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स या म्हणजे 'वडापाव ब्रॅंचेस'. खरे इंजिनिअरिंग म्हणजे कोअर ब्रॅंचेस - मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल नाहीतर सिव्हिल."
"अहो ते कॉम्प्यूटरचे काही खरे नाही. आज आहे, उद्या नाही. मेकॅनिकल, आणि सिव्हिल कसे - जग बुडाले तरी छिन्नी हातोडा कुठे जात नाही !"
"कॉम्प्यूटर ना, साईड बाय साईड करता येते. NIIT मधे नाही का ढिगाने कोर्स असतात."
"मेकॅनिकल करून कॉम्प्यूटरला जाता येते नंतर. उलटे नाही करता यायचे."
"प्रिंटिंग चांगले. त्यात थोड्याच सीट्स असतात. सगळ्यांना नोक-या मिळतात."
"इलेक्ट्रॉनिक्स च्या ऐवजी कॉम्प्यूटर ला जा. तसा अभ्यासक्रम सारखाच असतो. कॉम्प्यूटर ला नोक-या ब-या मिळतात हल्ली."
"शी प्लेन इलेक्ट्रॉनिक्स अजिबात घेऊ नकोस. इलेक्ट्रॉनिक्स विथ टेलिकॉम असेल तरच घे बाई !"
"मेकॅनिकल ला मरण नाही!"
"VIT म्हणजे नुस्ती शाळा आहे. कॉलेज लाईफ पण हवे की नाही थोडेसे !"
"शेवटी COEP ते COEP ! आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज म्हटले की तेवढेच समजते. बाकीच्या कॉलेज मधे काही अर्थ नाही"
"छे हो ! हल्ली COEP मधे काही राम राहिलेला नाही. बेकार स्टाफ !"
"ते ऑटॉनॉमी का कायससं मिळालं आहे ना आता COEP ला ? ते बरं का वाईट ?"
"PVG घराच्या जवळ आहे. तेच घेतलेले बरे..."
"MIT चे कॅंटीन कसले आहे पहिलेस का ? कॅम्पस स्टड आहे !"
"कम्मिन्स्स नक्को घेऊ बाई. नुस्तं मुलींचं कॉलेज. नो गाईज :( सो बोअरिंग..."
"उलटं बरं की ग ! जरा सुरक्षित वाटतं आपल्या मुलींना घालायचं तिथे म्हणजे..."
"COEP हे बोट क्लब असलेले एकमेव कॉलेज आहे ! Full Maaz !"
"PICT हे Comp ला बेस्ट आहे. इतक्या वर्षांची परंपरा आहे..."
"पण ओव्हरऑल COEP ला प्लेसमेंट चांगले आहे."
"इथे जॉब कुणाला करायचाय ? इथे डिग्री छापायची आणि सरळ स्टेट्स ला सुटायचे. Purdue नाहीतर Stanford मधून MS झाले की लाईफ बनेल."

--

कशासाठी शिकायचे ?
Engineer College मधे कशासाठी जायचे ?
ज्ञान, आवड, गरज, पैसा, समाधान, सामाजिक प्रतिष्ठा, छंद, Extracurricular Activity, टवाळक्या, आई-बाबांना कृतार्थ करायला... नक्की कशासाठी ?
प्रत्येक शाखेत काय शिकावयास मिळते ?
तुम्हांस ते आवडते का ?
झेपेल का ?
पुढे करियर च्या संधी काय असतात ?
वस्तुस्थिती काय आहे ?
बदलत्या जगाचे नियम काय आहेत ?

--

स्वत:ला काडीची अक्कल नसताना लोकांना फुकटचे सल्ले देणारे आणि गैरसमज पसरविणारे हे महामूर्ख आजूबाजूला नसते तर किती बरे झाले असते नाही ?

Thursday, January 19, 2006

टवाळा आवडे विनोद !

संदर्भातून वाक्ये बाहेर काढणे, शब्द बदलणे, वाचन करताना मथितार्थ नजरेआड करून भलताच अर्थ लावणे यासारख्या वाचन-दुर्गुणांमुळे कित्येकदा अर्थाचा अनर्थ होतो. अनेकदा एखाद्या प्रसिद्ध ग्रंथातून अवतरणे देऊन स्वत:चा व्यासंग दाखविण्याच्या निष्फळ प्रयत्नात लोक भलतेच संदर्भ भलत्या ठिकाणी वापरतात. याचंच एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे 'टवाळा आवडे विनोद'.

दासबोधातील एका ओवीचा हा चतकोर तुकडा (नीट न) वाचून अनेकांचा असा ग्रह होतो की रामदास स्वामींना विनोदाचे वावडे होते ! या वरून काहींनी समर्थांवर टीका केली आहे, तर काहींनी हा समज खोटा कसा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे.

ही ओवी दासबोधाच्या सातव्या दशकातील श्रवणनिरूपण या नवव्या समासाची ५१ वी ओवी आहे. संपूर्ण ओवी याप्रमाणे :
टवाळां आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद । गोड वाटे ॥
(अर्थ: थट्टेखोर माणसास विनोद आवडतो, अंगात माज आलेल्या माणसास नाना व्यसने आवडतात, तर तामसी माणसास दुष्कर्म करणेच गोड वाटते.)

संदर्भाच्या कुशीतून खुडलेले पोरके शब्द त्यांचा अर्थ चटकन गमावतात. म्हणून ही ओवी कोणत्या संदर्भात येते ते प्रथम पाहू. या समासात विविध प्रकारच्या लोकांना त्यांच्या रूचीप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी कशा आवडतात याचे मोठे रसाळ विवेचन करताना समर्थ सांगतात -
ज्ञानियास पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे भजन । साधकास पाहिजे साधन । इछेसारिखे ॥
परमार्थ्यास परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मनापासुनी ॥
... याच ओघात समर्थ वरील श्लोक सुद्धा सांगतात. तात्पर्य,
'आवडीसारखे मिळे । तेणें सुखचि उचंबळे ।' हे श्रोत्यांना समजावून सांगताना दिलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे 'टवाळा आवडे विनोद'. इतकी साधी सोपी गोष्ट आहे ! परंतु 'संदर्भासह स्पष्टीकरण' हे केवळ परिक्षेत गुण मिळविण्यासाठी वापरायचे असते !

बरे, संदर्भ सोडून द्या. तरीसुद्धा या वाक्याचा अर्थ, 'टवाळ माणासाला विनोद आवडतो' एवढा आणि एवढाच होतो. यापुढे जाऊन, 'विनोद आवडणारा माणूस टवाळ असतो' असा या विधानाचा अर्थ अजिबात होत नाही !! उदा. 'माकडाला फुटाणॆ आवडतात' याचा अर्थ 'फुटाणॆ आवडतात तो प्रत्येक जीव माकड असतो' असा अजिबात होत नाही !! (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी 'Logic' मधले Converse, Inverse आणि Contrapositive हे प्रकार पहावेत...)

आता निर्धास्तपणे विनोद करा ! तसेही 'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्' असे म्हटलेलेच आहे :)